follow us
on twitterज्योतीने तेजाची आरती    नमस्कार मित्रहो, आता आपल्या ‘हिंद जागृती’ला सुरु करुन सात वर्षे पूर्ण होत असून लवकरच आठव्या वर्षात पदार्पण करत आहोत. खरं तर ही सात वर्षे दैनिकाची झाली. त्यापूर्वी साप्ताहिकाच्या माध्यमातून हिंद जागृतीने आपल्या सेवेत सतत समाजमनाला जागृत करण्याचे काम केले होते. साप्ताहिकाच्या माध्यमातून आम्ही लावलेले हे बीज आपण सर्वांनी मोठे केले, त्याला रुजवले आणि म्हणूनच साप्ताहिक हिंद जागृतीचे दैनिकात रुपांतर करण्याची हिम्मत आम्ही दाखवू शकलो. पत्रकारिता करणे म्हणजे सतीचे वाण असते आणि वर्तमानपत्र चालवणे ही तारेवरची कसरत. मात्र, हिंद जागृतीच्या माध्यमातून बळीराजाच्या समस्यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून उभं राहणारं, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न पोटतीडकीने मांडणारं एक साधन म्हणून आम्ही उभे राहिलो आणि आमची भूमिका जनतेनं स्विकारली. जनतेच्या याच पाठबळावर हा खडतर प्रवास पूर्ण झाला. या प्रवासात अडचणी नव्हत्या असे मुळीच म्हणता येणार नाही. मात्र, ज्या-ज्या वेळी अडचणी आल्या त्या-त्या वेळी हक्काने धावून येणारे हात या समाजातूनच समोर आले. म्हणूनच हिंद जागृतीचा प्रवास सुरु राहिला.
        दैनिक अथवा प्रसारमाध्यम हे जागृतीचं साधन आहे हे कायम ध्यानात ठेवून आपण छापत असलेल्या प्रत्येक शब्दाचे पडसाद काय उमटतील याचे भान ठेवूनच हिंद जागृती चालत राहिला. तसा मराठी पत्रकारितेला अनेक थोरामोठ्यांचा उज्वल वारसा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही काम करतोय हे सांगण्याचे धाडस आम्ही नक्कीच दाखवणार नाही. मात्र, त्यांच्याच तेजातून प्रेरणा घेवून एका ज्योतीप्रमाणे शक्य तेवढा परिसर प्रकाशमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हिंद जागृती करत आला आहे. एका हिंदी कवीच्या काही ओळी आज या ठिकाणी उदघृत करण्याचा मोह यावेळी आम्हाला आवरत नाही. हिंद जागृती सुरु करताना आमच्या डोक्यात जी कल्पना होती त्या कल्पनेचे प्रतिबींब या ओळीमध्ये आहे.

"हो गयी है पीर, पर्वतराशी पीघलनी चाहिऐ
हिमालय से फीर कोई गंगा निकलनी चाहिऐ
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
मै यह चाहता हूँ की सुरत बदलनी चाहिऐ
तेरे सिने में नही तो मेरे सिने में
यह आग लगनी चाहिये!!"

आणि चेहरा बदलण्याची ही आग मनात घेवून सात वर्षापूर्वी साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात झाले. दैनिकांच्या भाऊगर्दीत हिंद जागृती टिकेल का असा प्रश्‍न अनेकांनी विचारला. काहींनी या धाडसाबद्दल कौतुक करतानाच पण तुमचं कसं होईल? असा प्रश्‍नही उपस्थित केला. मात्र, वाचकांवर विश्‍वास ठेवून जे पाऊल टाकलं आज त्या पावलाला आपणा सर्वांच्या सदिच्छांचं हजारो हत्तींचं बळ मिळालं आहे. हे सांगताना आम्हाला आनंद वाटतो. आजपर्यंत हिंद जागृतीच्या माध्यमातून अनेक गोष्टींना वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. मग तो सर्वसामान्यांवर झालेला अन्याय असो किंवा या भागाच्या विकासाच्या प्रश्‍नांकडे झालेले दुर्लक्ष, अनेक वर्षांपासून खीतपत पडलेले प्रश्‍न असतील अथवा या समाजात बनवाबनवी करुन स्वत:च्या दुकानदार्‍या चालवणार्‍या प्रवृत्ती. या सर्वांचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न हिंद जागृतीच्या माध्यमातून झाला. अनेकदा समाजातील काही अनिष्ठ प्रथांविरुद्ध कठोर शब्द वापरण्याची वेळ आली. मात्र, ते शब्द एखाद्या व्यक्तीसाठी नव्हते तर त्या वाईट गोष्टीसाठी होते हे आमच्या वाचकांनीही मान्य केले. समाजापेक्षा आणि देशापेक्षा कोणताही व्यक्ती मोठा नसतो आणि समाजाच्या विकासाला जे आडवे येतील त्यांना माफही करायचे नसते हा वारकरी सांप्रदायाचा संस्कार घेवून हिंद जागृती चालत राहिला. समाजाच्या हिताआड येणार्‍या ‘स्वकियांची’ही खरडपट्टी काढण्याचा विचार आमच्या प्रवासात आम्हाला मार्गदर्शक ठरला. समाजातील चांगल्या गोष्टींवर प्रकाश पडावा यासाठी झटणारा हिंद जागृती समाजप्रेमाचे बेगड लावून समाजविघातक कृती करणार्‍या व्यक्तींविरुद्ध पेटून उठला आणि जनमत पेटवण्याचे कामही करता आले याचा आज आम्हाला सार्थ आभिमान आहे.
         दैनिक कोणा एकावर टिका करण्यासाठी किंवा कोणाला तरी झोडण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही वापरले नाही त्यापद्धतीने कोणाची तरी भाटगिरी करण्यासाठीही आम्ही आमची लेखणी चालवली नाही. सतत वाहणारा वारा जसा सुगंध आणि दुर्गंध दोघांनाही सोबत घेवून वाहतो अगदी त्याचप्रमाणे समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी आम्ही वर्तमानपत्रांमधून मांडल्या. बातमीदारीशी प्रामाणीक राहून सुरु केलेली वाटचाल निश्चितच सहज आणि सोपी नव्हती. वर्तमानपत्रांच्या भाऊगर्दीत तत्वाने पत्रकारिता आता सोपी राहिलेले नाही याची आम्हालाही जाणीव आहे. म्हणूनच आम्ही पत्रकारिता हा धर्म मानला. त्यामध्ये व्यावसायिकता येवू दिली नाही. जाहिरात हा वर्तमानपत्रांचा आत्मा असतो आणि जाहिरातींशिवाय वर्तमानपत्र चालूच शकत नाही. असे असतानाही एखादा जाहिरातदार दुखावेल, पुन्हा जाहिरात मिळणार नाही, बातमी छापल्यानंतर जाहिरातीचे पैसे बुडतील म्हणून त्याने केलेल्या चुकांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. ‘चुकला तो ठोकला’ या न्यायाने पत्रकारिता करताना जाणून-बुजून कोणालाही त्रास देण्याचे काम आम्ही केले नाही याचा आम्हाला आज सार्थ आभिमान वाटतो. ज्यांच्या विरोधात आम्ही लेखणीतून ताशेरे ओढले त्यात कुठलाही हेवादावा नव्हता. जसे चुकीच्या गोष्टींवर आम्ही सडेतोड प्रहार केला तसा चांगल्या कामाचे कौतुक करायलाही आम्ही कचरलो नाही. म्हणूनच आमची भूमिका जनतेलाही पटली.
         वर्तमानपत्राचा सात वर्षांचा कार्यकाळ निश्चितच मोठा नाही याची आम्हालाही जाणीव आहे. मात्र, या सात वर्षात हिंद जागृतीने आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात निश्चितच यश मिळवले. हिंद जागृतीला वाचकांनी भरभरुन प्रेम दिलं, जाहिरातदारांनी एका चांगल्या गोष्टीच्या वाढीसाठी मनमोकळेपणा दाखवला. हिंद जागृतीने आपली लेखणी चालवली ती प्रवृत्तीच्या विरोधात आणि म्हणूनच अनेक वाईट गोष्टी घडल्यानंतर तिचे वृत्तांकन हिंद जागृतीत आल्यानंतर हे तुमच्याकडेच छापून येईल असे वाटत होते ही विश्‍वासाची थाप वाचकांनी पाठीवर मारली. दैनिकांच्या भाऊगर्दीत आणि साखळी वर्तमानपत्रांच्या स्पर्धेत आम्ही फार मोठा आदर्श निर्माण केला आहे असा दावा आम्ही करणार नाही किंवा वाचक संख्येत आम्ही अमुक क्रमांकावर आहोत असे छातीठोकपणे सांगण्याचीही आम्हाला गरज नाही. पण एखाद्या दिवशी वेळ चुकली आणि पार्सल पोहोचले नाही तर अख्खी सकाळ एजंट आणि वाचकांच्या फोनला उत्तर देण्यात जाते. एवढा विश्‍वास हिंद जागृतीने नक्कीच कमावला आहे. हे सारे हिंद जागृतीवर प्रेम करणार्‍या वाचकांमुळेच झाले आहे. मागच्या सात वर्षात हिंद जागृती कोणाचा भाटही झाला नाही आणि कोणाचा विरोधकही झाला नाही. समाजात जे काही घडतं ते दाखवण्याचा प्रयत्न हिंद जागृतीने केला. या बीड जिल्ह्याचे असलेले तेज या ज्योतीने आरती करुन सर्वांना सांगितले. वाचकांच्या अपेक्षा लक्षात घेवून हिंद जागृतीमध्ये अनेक महत्वाचे बदल करावे लागले. अनेक वेळा हे बदल करणे अडचणीचे आणि आर्थिक भार न परवडणारे होते. तरीही वाचकांच्या अपेक्षांना अग्रस्थान देवून हे बदल करावे लागले.    
     हिंद जागृती रंगीत होवून आता एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे आर्थिक भार वाढला असला तरी वाचकांच्या आणि जाहिरातदारांच्या प्रेमामुळे हे आव्हानही आम्ही पार केले. सध्याच्या धावपळीच्या युगात आणि जिवघेण्या स्पर्धेत प्रत्येकाकडे श्‍वास घ्यायलाही उसंत नाही. तंत्रज्ञान आणि विज्ञानानेही मोठी प्रगती केली आहे. हळूहळू तंत्रज्ञानातले अनेक बदल हिंद जागृतीने स्विकारले. याही पुढे नव्या नव्या बदलाला हिंद जागृती सामोरा जाणारच आहे. इंटरनेट, फेसबुक, ट्वीटर, हॉट्स अप या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जग एकमेकांजवळ येत अहे. याचाच विचार करुन दै.हिंद जागृतीची दर्जेदार वेबसाईट बनवून आता ई-स्वरुपात आपल्यासमोर घेवून येत आहोत. दैनिकाच्या सात वर्षांच्या काळात आपल्या प्रेमाची शिदोरी आमचा प्रवास सुखद करत होती. वाचकांची साथ अशीच यापुढेही मिळत राहील हा विश्‍वास यावेळी व्यक्त करतो. हे सर्व सांगत असताना ज्या वार्ताहरांनी, ठिकठिकाणच्या एजंटांनी हिंद जागृती सर्वांपर्यंत पोहोचवला त्यांचा उल्लेख न करणं म्हणजे करंटेपणा ठरेल. आमच्या परिवारातील प्रत्येक कर्मचार्‍याने हिंद जागृतीसाठी आपला जो वेळ दिला त्यासाठीही त्यासर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. हा प्रवास आपणा सर्वांच्या सहकार्याने वर्षानुवर्षे अविरत चालू राहील हाच आशिर्वाद वाचकांकडे मागून थांबतो. धन्यवाद!


आपलाच,
अभिमन्यू घरत
संपादक

Vister Counter